top of page
Writer's pictureDr. Prain Dumbre

आळस

आई वडील मुलांना सकाळी लवकर उठवत असतात. 'अरे बाळा!... लवकर उठ, शाळेत जायचय, कॉलेजमध्ये जायचय, व्यायाम करायला उठायचय, कामावर जायच नाही का?' आणि बाळ म्हणतो; 'थांब ना गं आई!.. पाच मिनिटात उठतो.' असं करता चांगला तासभर वेळ संपतो. आणि असाच उठणाऱ्याच्या अंगात आळस चढलेला असतो.


पूर्वीच्या काळी बहुतेक सर्वच जण, लवकर म्हणजे चार पाच वाजता उठत असत. आई-वडील लवकर उठलेले असायचे. वडील लवकर उठून, स्वतःचे आवरून पातेल्यात किंवा बंबामध्ये पाणी तापवण्याचे काम करायचे. त्यांच्या बरोबरीनेच आई सुद्धा लवकर उठून स्वतःचे आवरून, अंथरून पांघरूणांच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवत असे. मग स्त्रियांच्या हाती पहिला काय येत असेल, तर तो म्हणजे झाडू, म्हणजेच 'लक्ष्मी' आणि या लक्ष्मीने सर्व घर झाडून घेतले जायचे. घराला स्वच्छ, लख्ख करण्यापासूनच सकाळची सुरुवात व्हायची. घरात पाणी भरणे आणि सडा मार्जन करून रांगोळी काढली जायची. देवघरात देवपूजा करून, सर्वत्र अगरबत्तीचा सुवास दरवळत असायचा. 'वासुदेव आला हो वासुदेव आला' असे म्हणत; वासुदेव ही घराच्या अंगणात यायचा आणि आई त्याच्या झोळीत धान्य घालायची. मग तुम्हाला त्याच्या, 'दान पावलं... हो, दान पावलं...बाबा दान पावलं' या सुमधुर गीताचा आवाज कानावर यायचा. परंतु हे सर्व सुवर्णक्षण जो लवकर उठायचा त्यालाच लाभायचे.


ज्याला लवकर काम धंद्याला जावे लागते, तो लवकर उठतो. ज्यांच्या मुलांनाही शाळा, कॉलेजमध्ये लवकर जावे लागते, त्यांनाही लवकर उठावे लागते; आणि या सर्वांचे लवकर आणि वेळेत आवरून देण्यासाठी, घरच्या गृहिणींना सुद्धा लवकरच उठावे लागते. आळस करून चालत नाही. काही लोकांना, विद्यार्थ्यांना बसेस, स्कूल बसेस, रेल्वेने सुद्धा वेळेतच प्रवास करावा लागतो. आणि मग एक मिनिटभर उशीर झाला तर शाळेत, कामावर उशिरा जाणे भाग पडते. मग लेटमार्कचा शेरा पडतो. विद्यार्थ्यांना हातावर छडी घ्यायला लागते, काही शिक्षा होतात. मिटींगला जायला उशीर आला तर बॉसचे खूप काही ऐकावे लागते.


संस्कृत मध्ये आळस यावर खूप छान सुभाषित आहे.

'अलसस्य कुतो विद्या ,अविद्यस्य कुतो धनम् ।'

'अधनस्य कुतो मित्रम् ,अमित्रस्य कुतः सुखम् ॥'

आळसामुळे विद्या मिळत नाही आणि विद्येमुळे धन मिळत नाही. ज्याच्या जवळ धन नसते त्याला कोणी मित्र भेटत नाही. आणि ज्याला मित्र नसतो, तो कधीही सुखी नसतो.


माझ्या मुलाला, प्रतिकला मी त्याच्या खुप लहानपणी म्हणत असे, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे.' तर तो हातातील खोटी बंदूक अंगाला लावून 'ढिश.. ढिश..' करत असे. म्हणजे त्या आळसाला त्याने शरीरातून घालवले आहे, असे त्याला वाटायचे. लहानपणापासून आई-वडिलांनी आम्हाला सकाळी लवकर उठायला, व्यायाम करायला शिकवले. पहाटे लवकर उठल्यावर अभ्यासही चांगला होत असे. तीस वर्षांपूर्वी मी आमच्या गावच्या म्हणजे, ओतूरच्या मांडवी नदीत पोहायला शिकलो. पहाटे लवकर उठून मित्रांबरोबर पोहण्यासाठी दोन किलोमीटर पायी चालत जाणे ही खूप छान पर्वणीच असायची. निसर्ग संपन्न आणि रम्य परिसर असलेल्या कपर्दीकेश्वर आणि चैतन्य महाराज मंदिराच्या सभोवती असलेला परिसर...भल्या पहाटे पोहणे म्हणजे, मन अगदी प्रसन्न होऊन जात असे. आता सुद्धा पहाटे, लवकर उठून आणि शतपावली म्हणून चालण्याचा व्यायाम वेळेवर सुरू आहे. अशा सुंदर जीवन शैलीमुळे रक्तदाब आणि मधुमेह अद्याप माझ्याकडे फिरकले नाहीत.


आपल्याकडे "लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' अशी किती साधी सोपी म्हण आहे. पण आळशी लोक नेहमीच्या उलट वागत असतात, ते उशिरा झोपतात. आणि मग लवकर उठायचा त्यांना खूप कंटाळा येतो. उशिरा उठल्यामुळे आळस त्यांच्या अंगातून लवकर जात नाही. कंटाळाने वाटते, अंगात त्राण नाही असे वाटते. काही लोक लवकर जाग आली तरी पांघरून ओढून घेवून अंथरुणातच इकडून तिकडे लोळत पडलेले असतात. व्यायामाचा आणि यांचा तर ३६ चा आकडा असल्यासारखेच वागतात. परिणामी जागरणामुळे पित्ताचा त्रास, डोकेदुखी, अपचन, शौचास साफ न होणे, मुळव्याध इत्यादी इत्यादी त्रास पुढे पुढे होत जातात. स्थूलपणा वाढून सुरुवातीला रक्तदाब व त्यानंतर हळूहळू चोर पावलाने शरीरात प्रवेश करणारा रोग म्हणजे मधुमेह...हा रोग मरेपर्यंत कायमस्वरूपी साथ सोडत नाही. आणि शेवट हृदयविकाराने होतो हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.


'येरे हरी आणि दे खाटल्यावरी' असे होणार नाही. सुदृढता आणि शरीर संपदा आपल्याला बसल्या जागेवर मिळणार नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या आळसाला झटकून लवकर उठून कामाला, अभ्यासाला लागावे लागेल. व्यायाम, पोहणे, चालणे, धावणे, सायकल चालवणे, योगासने याद्वारे आरोग्य कमवावे लागेल. तरच स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य बिघडणार नाही. आणि सर्वांचे आयुष्यमान शंभरी नक्कीच गाठेल अशी आशा करूया.


©️®️

🦚 डॉ. प्रविण डुंबरे 🦚

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

Recent Posts

See All

Comments


bottom of page