कोणत्याही शास्त्राने, अस्त्राने, अपघाताने शरीरावर अथवा मनावर आघात होतो, इजा होते. ही इजा आपल्या स्वतःच्या हातून दुसऱ्याला, किंवा दुसऱ्याकडूनही आपल्याला होत असते. घाव करणारी वस्तू किती छोटी किंवा मोठी आहे, त्यातूनच होणारा आघात किती छोटा किंवा मोठा होतो, व तेव्हढा त्याचा परिणाम दिसतो. छोट्या मुक्या मारा पासून छोटी जखम, मोठमोठ्या जखमा.. टाक्यांच्या स्वरूपात होतात, तर काही प्रसंगी आघातात हाडांची मोडतोड सुद्धा होते. वेळप्रसंगी जीवही जाऊ शकतो. अचानक आपल्याला न सांगता आपल्या शरीराला, मनाला होणारी इजा ही, पीडा किंवा क्लेश उत्पन्न करते. हळूहळू त्या आघाताचे परिणाम दिसायला सुरुवात होतात. शरीरावर सूज येते, आघात झालेली जागा ठणकू लागते. या सर्वांवर योग्य वेळीच उपचार केले नाही, तर दुखणे बळावते. जखम पिकू शकते आणि जीवावरही बेतू शकते.
योग्य उपचार आणि ठराविक कालावधी गेल्यानंतर या इजांमधून मनुष्य हळूहळू बाहेर पडतो. जिथे जखम होते त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्रणही राहू शकतो. माणसाच्या हृदयावर, मनावर आणि काळजावर सुद्धा अपघाताचा आघात, परिणाम होत असतो. अपघाताच्या आठवणीतून सुद्धा माणसाला बाहेर पडायला काही कालावधी लागतो. मनावर जास्तच आघात बसला असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला घ्यावा लागतो. असे अपघात झाल्यावर जीवनात अनेक आघात पचवलेली नातेवाईक, मित्रमंडळी लगेचच धावून येतात. विविध सल्ले देऊन, धावपळ करून अपघात ग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. पैसे आणि अमूल्य वेळ देऊन काळजी घेतात. अपघातानंतर सुद्धा मानसिक संतुलन योग्य व्हावे म्हणून हे लोक वेळोवेळी येऊन भेटतात, आणि येऊन गेलेल्या संकटावर मात करण्यास शिकवतात. नोकरी व्यवसायात पुन्हा उभारी घेण्या विषयी सल्ले देतात.
' टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही,' असे म्हटले जाते. टाकीचे घाव हे दगडावर सतत बसत असतात. हे घाव झेलण्याची क्षमता त्या दगडामध्ये असली, तर त्या दगडाला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. त्या दगडातून सुंदर शिल्प तयार होते. परंतु त्या दगडामध्ये जर हे घाव झेलण्याची क्षमता नसेल, तर एक घाव बसताच त्या दगडाचे क्षणार्धात, शंभर तुकडे होतात.
सुवर्ण म्हणजेच सोने या धातूलाही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. अनेक घाव सोसावे लागतात. खाणीतून मिळालेल्या कच्च्या सोन्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तप्त अग्निचे चटके ही सहन करावे लागतात. असंख्य घाव झेलून धगधगत्या अग्नीचे चटके सहन केल्यावरच, अस्सल सोन्याला सुवर्णमय झळाळी प्राप्त होते. आणि त्याचे खरे मोल काय आहे ते समजते. दगड काय किंवा सोने काय जेव्हा असंख्य घाव, प्रहार त्यांच्यावर होतात, तेव्हाच त्यातील श्रेष्ठ गुण सर्वांसमोर येतात. आणि त्याची महती समजून येते.
'जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण,' असे म्हटलेलेच आहे. मनुष्याचेही असेच काहीसे आहे. जेव्हा मनुष्यावर नियतीचे, परिस्थितीचे असंख्य घाव होतात, तेव्हा तो तावून सुलाखून निघतो. त्याच्यातले सुप्त गुण जागृत होतात, आणि आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी तो, जिद्दीने कठीण प्रसंगाचा सामना करण्यास सज्ज होतो.
आलेल्या प्रत्येक संकटात मनुष्य देवाचा धावा करत असतो. आणि संकटांशी दोन हात करण्यासाठी आणखी बळ मागतो. साधी माणसं या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचे गीत, लता मंगेशकर यांनी गायले आहे. हे गीत ऐकल्यावर घन.. घन.. करणारा लोहाराचा भाता आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
'घाव बसंल घावावरी सोसायाला झुंझायाला अंगी बळ येऊ दे...'
‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे...
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे..'
बसलेल्या घावामुळे मनाला दुःख होते. कशात मन लागत नाही. संकटाला सामोरे जाताना कधी कधी एक घाव दोन तुकडे करावे लागतात. कधी कधी संकटाच्या मुळावरच घाव घालावा लागतो. मुळावर घाव घातला की झाडाच्या फांद्या आपोआप गळून पडतात. संकटाच्या आलेल्या या संधीचे सुद्धा माणसाने सोन्यात रूपांतर करून घेतले पाहिजे.
ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात, त्याचं नात्यांना खरा अर्थ असतो.
बाकीची नाती म्हणजे केवळ, माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत..!
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
असे आपल्या आत्म्याचे गीतेत वर्णन केले आहे. म्हणजे आत्म्याला शस्त्रांनी तोडता येत नाही, अग्नीने जाळून नष्ट करता येत नाही. आत्म्याचा विनाश होऊ शकत नाही. आत्मा अमर आहे. परंतू एखाद्याचे शब्द, घाव आत्म्याला खुप जिव्हारी लागतात.
©️®️
डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर
शिवजन्मभूमी (पुणे)
९७६६५५०६४३
Commentaires