top of page
Writer's pictureDr. Prain Dumbre

संधी

संधी या शब्दाचा समानार्थी शब्द अवसर, शक्यता किंवा मोका असाही होतो. काही घडण्याची शक्यता असल्यास, ते घडण्याची शक्यता आहे. तुम्ही जिंकालच याची शाश्वती नाही, पण संधी घेतलीच नाही तर कधीच कळणार नाही की, तुम्ही त्या परिस्थितीत त्यावेळी मिळणाऱ्या फायद्याचे हक्कदार होता की नाही. संधीचे सोने करणे... म्हणजे मिळालेल्या संधीचे रूपांतर अभ्यासपूर्वक, कष्टपूर्वक, वेळ आणि पैसा देऊन स्पर्धेतील इतरांना मागे सारून..इतरांपेक्षा यशस्वी होऊन दाखवणे किंवा त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे. जीवनात प्रत्येक मनुष्य हा त्याच्या डोळ्यापुढे काहीतरी ध्येय ठेवून मार्गक्रमण करत असतो. बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळात सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यापुढे अनेक मार्ग असतात. आणि त्या सर्व मार्गांवर अनेक प्रवासी सुद्धा स्पर्धेमध्ये चालत असतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती, लग्न, घर, बंगला, इमारत अथवा व्यवसायासाठी जागा घेणे यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो.


पूर्वीच्या काळी अशिक्षित आणि अडाणी असणारा आपला सर्वच समाज शिक्षणापासून वंचित राहिला होता. परंतु काळाच्या ओघात ज्ञानाची गंगा घरोघरी आणून, शिक्षणाचा मूलमंत्र प्रत्येकाच्या दारात व अंगणात पोहोचवणारे थोर सुधारणावादी लोकनेते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे इत्यादींनी महान कार्य केले. स्त्रियांच्या फक्त 'चूल आणि मुल' या परंपरावादी विचारांना चिकटून बसलेल्या समाजाला आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने योग्य दिशा दाखवून प्रसंगी समाजाकडून प्रचंड विरोध, मानहानी पत्करून महिलांना शिक्षणाची संधी या सर्व थोर समाज सुधारकांनी पूर्वीच्या काळी दिली होती. म्हणूनच आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, नव्हे नव्हे.. त्यापेक्षाही पुढे जाऊन स्त्रिया शिक्षण, नोकऱ्या आणि प्रत्येक क्षेत्रातच पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. हीच संधी त्याकाळी स्त्रियांना मिळाली नसती तर अजूनही चुलमुल आणि संसार यातच त्यांचा गाडा अडकून पडला असता.


शालेय जीवनामध्ये वेळोवेळी होत असलेल्या चित्रकला, वक्तृत्व, खेळ, काव्य आणि नाट्य स्पर्धा, परीक्षा इत्यादींच्या मध्ये भाग घेण्यामुळे मिळणाऱ्या संधीचा फायदा मुलांच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना विकसित होण्याची संधी त्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असते. आणि त्यातूनच भविष्यातील राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय चित्रकार, खेळाडू, कवी, लेखक, चित्रपट आणि नाटकातील अभिनेते, अभिनेत्री हळूहळू तयार होत असतात. शालेय शिक्षण घेत असताना क्षणोक्षणी मिळणाऱ्या संधीतूनच भविष्यातील नोकरीतील अथवा व्यवसायातील चांगल्या वाटांचा आणि विविध क्षेत्रांचा पाया मजबूत होत असतो. दहावीला विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भरपूर मार्क्स मधूनच विविध प्रकारची दर्जेदार महाविद्यालये आणि दर्जेदार विषय आणि शिक्षणाच्या शाखा यांची निवड घेण्याची संधी मिळत असते. बारावीनंतर असणाऱ्या जेईई, नीट, सीईटी या सर्वच स्पर्धात्मक परीक्षांवर वैद्यकीय, इंजिनिअरिंग साठीच्या संधी निर्माण होत असतात आणि मिळत असतात. पदविका अथवा पदवीनंतर सुद्धा सध्याच्या युगात स्पर्धात्मक परीक्षांद्वारेच पुढील शिक्षणाच्या संधी मिळत असतात. शिक्षणामध्ये आता प्रत्येक शाखेला सूक्ष्म अति सूक्ष्म शाखा फुटलेल्या दिसून येतात. योग्य संधी येताच, त्या शाखांचा अभ्यास करून त्यामध्ये शिक्षण, उच्च शिक्षण आणि प्राविण्य मिळवले तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी फायदाच होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्याही परीक्षांच्या संधी घेऊन मोठ मोठ्या हुद्द्यांवर आरुढ होण्याची संधी योग्य त्या वयात घेतली तरच मिळत असते. शासनाने नेमून दिलेल्या वयातच या परीक्षा द्याव्या लागतात अन्यथा वय निघून गेल्यानंतर मात्र ही संधी पुन्हा प्राप्त होत नाही.


पूर्वीच्या काळी दहावी, बारावी झाले तरी नोकऱ्या उपलब्ध असायच्या. त्यानंतरच्या काळात पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या संधी मुला मुलींसाठी उपलब्ध असायच्या. डीएड आणि बीएड झाल्यावर सुद्धा नोकऱ्या मिळत होत्या. वाड-वडिलांच्या पुण्याईवर अथवा नातेवाईकांच्या अस्थेवायिकपणावर आपल्या भाऊ-बहिणींना, नातेवाईकांना अथवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना नोकऱ्या मिळाल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळी आपल्याला पाहायला मिळत होती. मध्यस्थी करून, गळ घालून, शब्द देऊन, चिठ्ठी देऊन वेळप्रसंगी पदर पसरून सुद्धा नोकऱ्यांची कामे त्याकाळी होत होती. परंतु आता काळ बदलला आहे. नोकऱ्या नाहीत.. 'झिरो बजेटचा काळ आहे' आणि हा काळ सुद्धा पुढे पुढे सरकून, नोकऱ्याच मिळेनाशा झाल्या आहेत. आज आत्ता हा लेख लिहित असताना एका न्यूज चॅनेलवर झळकलेली बातमी अशी होती... पोलीस भरतीसाठी, १८ हजार जागांसाठी १८ लाख अर्ज आले होते. आणि या बातमीचे महत्त्व येथेच थांबत नाही. या सर्व अर्जांमध्ये, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आणि पोलीस हवालदाराच्या नोकरीची संधी घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये...उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील सुद्धा होते. जीवन जगण्यासाठी या सर्वांना या पोलीस नोकरीच्या संधीची खरोखर गरज होती. म्हणूनच तळमळीने अर्ज भरून.. छातीच्या पिंजऱ्यामध्ये मनाच्या संधीची सर्व हवा भरून, ऊर फाटेस्तोवर स्पर्धेच्या पटांगणावर हे सर्वजण पळत होते. आपल्याला मात्र हे सर्व प्रकार पाहिल्यावर खरोखर स्तब्ध व्हायला होते.


पूर्वीच्या काळी 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे.' परंतु 'कालाय तस्मै नमः' या उक्तीप्रमाणे या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. आधुनिक आणि प्रदूषित पर्यावरण बदलणाऱ्या युगात शेती बेभरवशाची झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नापिकी, अति दुष्काळ, गारपीट, अति पाऊस, पूरस्थिती यामुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन दुःखाच्या खाईत लोटला गेला आहे. ४० ते ५० वर्षांपूर्वी ठराविक लोकांची व्यवसायात असलेली मक्तेदारी, सर्वसामान्य लोकांच्या मुलांना नोकऱ्यांची संधी न मिळाल्यामुळे अख्खी पिढीच व्यवसायात उतरलेली आहे. परिणामी सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये स्पर्धा आली आहे. हॉटेल, किराणा, डॉक्टर, फार्मासिस्ट इत्यादी व्यवसायांचे सर्वत्र पेव फुटलेले दिसून येत आहे. नोकरदारांना मात्र आता चांगले दिवस आलेले आहेत. सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग यामुळे...'कनिष्ठ नोकरी,' ही संकल्पना बदलून, काही नोकऱ्यांमध्ये काही लोकांना आता लाखा लाखांचे पगार आणि लाखा लाखांचे निवृत्ती वेतन मिळत आहे.


घर, बंगला, इमारत अथवा व्यवसायासाठी जागा या सुद्धा खूप महत्त्वाच्या ठिकाणी असाव्या लागतात. जागांच्या खरेदी विक्रीमध्ये ९०% जागांचे व्यवहार झाल्यावर आपल्याला..'या या जागेचा व्यवहार..अशा अशा पद्धतीने झाला आहे,' असे समजते. तर दहा टक्के जागांमध्ये, आपल्या कानावर..'या जागेची विक्री करायची आहे,' असे लोकांकडून समजते. आपण वेळीच योग्य ती पावले उचलली नाही तर ती जागा घेण्याची संधी आपल्याला पुन्हा प्राप्त होत नाही. संधी खूप महत्त्वाची असते. आजच्या स्पर्धेच्या युगात काही ठराविक क्षणाला आणि वेळेला, न मिळालेल्या त्या संधीमुळे, आपण जगाच्या खूप पाठीमागे सुद्धा पडू शकतो. निरनिराळ्या व्यवसायातील उत्पादन झालेल्या मालाला देशात आणि परदेशात विक्रीची योग्य संधी मिळाली तर माणूस व्यवसायात स्थिरस्थावर होऊन श्रीमंत, अति श्रीमंत होऊ शकतो.


राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मोठमोठ्या पदांवर काम करण्याची, अंतराळात जाण्याची, चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. फारच थोड्या लोकांना संधीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर, यशाच्या त्या पायरीपर्यंत पोहोचता येते. आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात.. माणसाचे अस्तित्व जोपर्यंत या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत, आणि 'जिंकू किंवा मरू..' अशी प्रत्येकाची स्थिती असताना, योग्य वेळी येणाऱ्या प्रत्येक सोन्यासारख्या संधीचा उपयोग माणसाने जीवनात करून घेतलाच पाहिजे. जीवनात 'संधी..' ही तिच्या तिच्या वेळेत येऊन, आपला प्रत्येकाचा दरवाजा ठोठावत असते. नेहमीच्या व्यापात, तुमच्या रमलेल्या विश्वात अजाणतेपणी..तुम्ही बंद करून ठेवलेला... दरवाजा उघडा... प्रयत्न, कष्ट, जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, वेळेची आणि पैशांची बचत यांच्या जोरावर...संधीचा फायदा घ्या, आणि...तिचे सोन्यात रूपांतर करा.


डॉ. प्रविण डुंबरे.

ओतूर (पुणे)

९७६६५५०६४३

1 comentário


Sureshg Dumbre
Sureshg Dumbre
21 de jun.

डॉ. प्रविण आपण संधी या विषया विस्तृत लेखन केले आहे. संधी प्रत्येकाला मिळत असते, संधी गोरगरीब पाहत नाही. संधी मिळताच त्याचे सोने कसे करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते. आळस, दुर्लक्ष ,हुकली,हिमत नाकर्तेपणा मुळे संधीची वेळ टळली की तुमचं नशिब चुकलं. ती वेळ परत येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणा-यालाच यश १००%मिळते. नाही तर चुकलेल्या मार्गावर भरकटला जातो.नी दोष जन्म नात्यांना देतो. आपल्या जीवनाचे शिल्पकार, आपणच आहोत. हे वामनराव पै यांच वाक्य आहे. संधी मिळायला वेळ काळ वय कधीच अंतर्भूत नसते .ती केव्हाही येऊ शकते. आपण संधी विषयांवर छान आणि बोधक लिहिले आहे. अभिनंदन. असेच लिहीत रहा ! 🌹🌹🌹🌹🌹 🙏सुरेश गे. डुंबरे 🙏

Curtir
bottom of page