अर्थ साक्षर आहात का?
नाही . केवळ तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे , म्हणून तुम्ही "अर्थ साक्षर" आहात, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
अर्थ म्हणजे कवळ "पैसे' नाही . तर तो पैसा केव्हा, कुठे आणि कसा खर्च करायचा ? कशासाठी वापरायचा ? आणि केव्हा साठवायचा ? या सर्व गोष्टींचे ' योग्य' ज्ञान असणे, म्हणजे अर्थ साक्षर होणे.
आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का?
देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे म्हणजे नेमके काय?
बचत करायची गरज आहे का?
या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहित आहेत आहेत का?
आपल्या क्रमिक पुस्तकांमध्ये आपण बेरीज, वजाबाकी , गुणाकार , भागाकार अशा गणिती क्रिया शिकतो. पण, दुर्दैवाने , मिळालेल्या पैशाचा विनियोग करताना फक्त वजाबाकीच होते. बचतीच्या बेरजेचे गणित दूर अंतरावर उभे राहून फक्त आपल्याकडे पाहून स्मितहास्य करते. हे अंतर कमी करण्याचा एकच रामबाण उपाय म्हणजे योग्य आर्थिक नियोजन.
आपल्या सामाजिक मानसिकतेचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे मी कमावता होईल तेव्हा हे सगळे बघू. या विचारसरणीमुळे आपण आपल्या पायावर मोठ्ठा दगड मारून घेत आहोत. कारण, आर्थिक साक्षरतेकडे अजूनही आपण गांभीर्याने पाहत नाही.
सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार म्हणून ज्यांना सारे जगात ज्यांना मान आहे ,अशा वॉरेन बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती .
आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याकडे नसणे म्हणजे आर्थिक संकटांना निमंत्रण देणे. मूलभूत शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य या गोष्टींकडे जेवढ्या प्रमाणात लक्ष दिले जाते, तेवढेच ते आर्थिक साक्षरेला देणे , ही आजच्या काळाची गरज आहे.
संपन्न आणि समृद्ध जीवनाची, तसेच उज्ज्वल भविष्याची चावी ही अर्थ साक्षरतेत आहे. आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबत ज्ञान असल्याशिवायआपण या खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहू शकणार नाही. या बदलत्या जगाला तोंड देऊच शकणार नाही.
थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा विसर पडलेली , ही नवी पिढी , अनियंत्रित खर्चाच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटून जात , भोगवादी संस्कृती अंगीकारत आहे. बचतीच्या नव्या व्याख्ये बरोबरच काय नको, याचे भान असणे , महत्वाचे आहे.
जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
– वॉरेन बफे
वैयक्तिक अर्थ साक्षरते बरोबरच सामाजिक साक्षरतेला ही प्राधान्य द्यायला हवे. आजकाल घडून येणाऱ्या , आर्थिक फसवणूक अथवा गैर व्यवहार टाळण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे सामाजिक अर्थ साक्षरता.
अर्थ साक्षर होऊया
समृद्ध जीवन जगूया
Comments