उद्योग - व्यवसाय प्रशिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी घेतलेले शिक्षण, या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. त्यांच्यात मूलभूत फरक आहे. व्यवसायात कार्यरत असलेले अनेक लोक सुद्धा या बाबतीत गल्लत करतात.
उद्योग प्रशिक्षण म्हणजे उद्योग सुरु करण्यासाठी , आपला उद्योग वाढविण्यासाठी, नवीन व्यवसायात प्रवेश करण्यासाठी, उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण.
हे खुप खरे आहे की उद्योजकाला मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि कोणतेही शिक्षण हे कधीच वाया जात नाही. परंतु, उद्योजक म्हणून विकसित व्हायचे असेल तर कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणे योग्य राहील?
वेळ, पैसे आणि उपयुक्तता , या तीन मुख्य कसोटींवर कोणकोणते अभ्यासक्रम टिकून शकतात , हे पाहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, हा अभ्यासक्रम कोणत्या संस्थेच्या अंर्गत समाविष्ट आहे ?
याचा देखील अभ्यास व्हायला हवा.
व्यवसाय शिक्षण हे व्यवसायांची विविधता आणि विपुलता या कारणांनी अनेक स्तरांवर आयोजित केले जाते किंवा उपलब्ध असते. त्या दृष्टीने सामान्यपणे व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणाची संरचना व्यापक ठरते. सध्या अनेक शासकीय आणि बिगर शासकीय संस्था उद्योग प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहेत.
व्यवसायशिक्षणाची दोन भिन्न स्वरूपे आढळतात.
1. नोकरीत प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असे व्यवसायपूर्व शिक्षण हा एक प्रकार आणि
2. सेवाकालात अधिक कार्यक्षमता मिळविण्यासाठी योजिलेले व्यवसायांतर्गत किंवा व्यवसाय-मध्य शिक्षण हा दुसरा प्रकार.
उमेदवारी पद्धतीमध्ये या दोन्ही स्वरूपांचा संयोग आढळतो. व्यवसायपूर्व शिक्षण साधारणत: पूर्ण वेळ चालणाऱ्या शिक्षणसंस्थांतून देतात आणि व्यवसाय-मध्य शिक्षण साधारणपणे अल्पकाळ चालणाऱ्या सायंकालीन प्रौढ शिक्षणवर्गात देतात.
व्यवसाय शिक्षणाचा हेतू विशिष्ट धंदा करून उपजीविका करता यावी, हा असतो, तर गुणवत्तेच्या शिक्षणाचा हेतू दृष्टिकोन व्यापक करण्याचा असतो.
उदा., प्राथमिक व माध्यमिक शाळांत चित्रकला शिकविण्याचा हेतू सौंदर्यदृष्टी निर्माण करणे व कल्पकतेस उत्तेजन देणे, हा असतो. उलट पहिल्या प्रकारात रोजगार यशस्वीपणे करावा, म्हणून शिल्पशाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षण दिले जाते. प्रगत देशांत व्यवसायशिक्षणाचा व्याप मोठा आहे. विद्युत, इलेक्ट्रॉनिकी, तंत्रविद्या, स्थापत्य, वैद्यक, सैनिकी, विधी, वाणिज्य, व्यवस्थापन, कृषी इ. विषयांच्या शिक्षणाची सोय विद्यापीठांत व महाविद्यालयांत केलेली असते. याच व्यवसायांतील निम्नस्तरीय उमेदवारांसाठी माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवर प्रशाळा असतात. इतकेच नव्हे तर न्हावी, धोबी, स्वयंपाकी, वाढपी, रक्षक, विक्रेता, मोटारचालक इ. व्यावसायिकांसाठीही शिक्षणाची सोय केलेली असते.
एखादे काम केवळ सरावाने करू लागणे व तेच काम तंत्रमंत्र समजून घेऊन शिकणे, यांत कार्यक्षमतेच्या दृष्टीने महदंतर असते, हे त्यामागील गृहीततत्त्व आहे. सर्व कामगार समाजाचे सेवक असतात, त्यांनी करावयाची सेवा कमीत कमी काळात व अल्प श्रमात समाधानकारक होण्यासाठी, केवळ उमेदवारी व्यवसायपद्धतीचा वापर न करता, विविध व्यवसायांसाठी शास्त्रोक्त शिक्षणाची सोय उपलब्ध होणे अगत्याचे आहे.
Comments