रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस मनापासून अभिवादन ...
कर्मवीर आमचा रयतेचा राजा
रयतेची असे तू माऊली
त्याने माणसाला माणुसकी दावली
त्याने माणसाला माणुसकी दावली
रयत मधील प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक या गाण्यातील बोलाने गहिवरून येतो. कारण, माणसातला माणूस पण जाणून त्यांना माणसासारखी वागणूक देण्यात विचार करणारे कर्मवीर अण्णा म्हणजेच आम्हा सर्वांचे गुरूतुल्य गौरव स्थानच आहेत.
जगात सर्वश्रेष्ठ तो मानवतावाद. अब्राहम मॅस्लो मानसशास्त्रीय विचारवंतांनी मानवतावाद हा विचार मांडताना आपल्या अण्णांसारखेच राजा राम मोहन रॉय, रवींद्रनाथ टागोर अशा अनेक दिग्गजांचा विचार नक्कीच केलेला असणार आहे. मानवतावाद हा मुळातच मानव कल्याण, माणसाची प्रगती त्याच बरोबर नैतिक आणि अध्यात्मिक विकास यावर आधारित ठरते आणि हाच विचार आणि सत्यशोधक समाजाची प्रेरणा घेऊन अण्णांनी कार्य सुरू केले.
अण्णांचे शिक्षण सहावी पर्यंत झाले. अर्थात, वडिलांची बदलीची नोकरी - ब्रिटिशकालीन नोकरी. त्यामुळे सतत होणाऱ्या बदल्या. बदलणारी शाळा, बदलणारे विद्यार्थी मित्र, बदलणारी शैक्षणिक व्यवस्था... यामुळे, जणूकाही अण्णांमध्ये बदल घडवण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
अण्णा तसे लहानपणापासूनच बंडखोर. एकदा तर अस्पृश्य लोकांना पाणी दिले नाही, म्हणून रागाने रहाटच मोडून टाकला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या मार्गावर चालत असतानाच, त्यांच्यावर सत्यसत्यशोधक समाज स्थापन करणारे महात्मा फुले, यांचा अण्णांवर विशेष प्रभाव पडला. त्याचबरोबर, कोल्हापूरचे राजे राजश्री शाहू महाराज त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अण्णांनी, बहुजनांचे मुले शिकावीत, त्यांचं कल्याण व्हावं, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा निर्धार केला आणि आजी सोनियाचा दिनू ठरला, तो 4 ऑक्टोम्बर 1919.
याच दिवशी अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि केवळ पुस्तकी शिक्षण, द्यायचं नाही. आपल्या विद्यार्थ्याने, एकूणच सर्व माणसांनी मिळून-मिसळून राहावे, एकमेकांचा आदर करावा इतरांचे दुःख समजून घ्यावं, सर्वांना समान म्हणावं, असा विचार करूनच शिक्षणाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन करावे, हा विचार अण्णांच्या ठायी होता.
सध्याच्या काळात मात्र काही अंशी हा विचार मागे पडलेला दिसतोय.
कौशल्याधिष्ठित शिक्षण (Skill based learning) हा विचार सर्वात प्रथम अण्णांनी केला आणि कमवा आणि शिका ही योजना जगात प्रथम रयत शिक्षण संस्थेने सुरू केली. विद्यार्थ्याला आयते दिले तर तो नीट शिकणार नाही आणि संस्थेचा वसतिगृहाचा डोलारा सांभाळला जावा, म्हणून योजना सुरू झाली.
सध्याच्या काळात विद्यार्थ्याला पोषण आहार दिला जातोय. परंतु, त्याने कमावलेला नाही. बहुतेक त्यामुळे त्याचा दर्जाही तसाच असावा. कौशल्य मुलांच्या अंगी असेल तर तो नक्की स्वावलंबी होईल, असा विचार अण्णांनी केला. आपण कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले तरी सर्वतोपरी यशस्वी होऊ शकत नाही अण्णांनी हेरले. या ठिकाणी वसतिगृह स्थापन केले. वसतिगृहातील मुलांना अन्न मिळेना, म्हणून त्यांनी मुस्तीफंड योजना सुरू केली म्हणजे काय तर रोज एक मूठ धान्य प्रत्येक घरातली स्त्री वसतिगृहाच्या मुलांसाठी राखून ठेवत असे. यामधून, समाजाला देखील वसतिगृहाचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजले. सर्वजण मिळूनच रयत शिक्षण संस्थेमध्ये सहभागी झाले होते आणि इतरांचे दुःख जाणून घेऊन वसुधैव कुटुम्बकम मानायचे, एकत्र चालायचे नदीसारखे सीमित न राहता अस्मिता पर्यंत पोहोचायचे शिक्षण अण्णांनी आपल्या कृतीतून दिले आणि माणसं तयार केली आणि आपसूकच ओळी उमटल्या रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे.
माझ्या बहुजन समाजातील विद्यार्थी शिकावा, म्हणून अण्णांनी पूर्ण महाराष्ट्रभर पायपीट केली. संत गाडगे बाबांची आणि त्यांची भेट झाली. गाडगेबाबा यांनी अण्णांना कर्मवीर ही पदवी बहाल केली, आपल्या कर्माने दीर्घकाळापर्यंत वीर म्हणून ओळखले जातील, असे हे आपले कर्मवीर.
शाळाबाह्य विद्यार्थी या काळात शोधणे, त्याला शाळेत आणले, बर... तो शाळेत येईल त्यानंतर त्याला प्रेमाने शाळेत टिकवणं, ही खूप कठीण गोष्ट आहे अण्णांनी त्या काळात इतकी शालाबाह्य मुलं एकत्र केली, शिकवली ,काही परदेशात पाठवली, त्यांच्या शिक्षणासाठी तत्कालीन सरकारचे मदतीसाठी दार ठोठावले, जणू यांची स्वतःची लेकरत प्रगतीकडे वाटचाल करत आहेत ,अशी अण्णांची वागणूक. हाच विचार धरून सध्या या काळात अनेक मुलांना आम्हा सारख्या शिक्षकांनी आणि शासनाने शिक्षित केले पाहिजे, असे मला वाटते.
अण्णांना साथ देणाऱ्या सुविद्य पत्नी माननीय सौ. लक्ष्मीबाई पाटील म्हणजे दोघे जीव आणि शिव. आपल्या पतीच्या कार्यात सहभाग देण्यासाठी आपली धार्मिक तत्वे देखील बाजूला ठेवली आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये वहिनीसाहेब मातेसम राबायचा ,सीतेच्या अश्रूने रामायण घडले आणि वहिनीच्या अश्रूने रयत शिक्षण संस्था घडली. छत्रपती शाहू महाराजांनी बोर्डिंग ची स्थापना केली. प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या बोर्डिंग स्थापन केले अण्णांनी मात्र कोणतीही भीडभाड न ठेवता समानता वादाचा आणि मानवतावादाचा विचार करून सर्व मुलांसाठी एकत्रित बोर्डिंग निर्माण केले.
सारेजण मिळवूया सारेजण शिकूया
जातिभेदाच्या भिंती सारेजण पाडूया
हा एवढा मोठा विचार जर सध्याच्या काळात पुन्हा झाला तर काही चुकीच्या मार्गाने आपल्या विद्यार्थ्यांसमोर ज्या जाती-धर्माच्या भिंती निर्माण होत आहेत ते आपोआप गळून पडतील.
आज त्यांच्या मानवतावदाची गरज खरच भासत आहे. कोणतीही गरज जेव्हा खूप काही बदलायचं असत, तेव्हाच निर्माण होत असते. सध्या खूप शिक्षण संस्था निर्माण झाले आहेत. मुलांना ज्ञानही देत आहेत. परंतु, त्याच बरोबर त्यांच्याकडून अधिकाधिक आर्थिक मोबदला घेऊन सधनही होत आहेत. यावेळी अण्णांच्या आयुष्यातील प्रेरक क्षण आठवतो -
वसतिगृहातील मुलांसाठी, मुलांच्या खाणे पिणे आणि देखभालीसाठी सदैव पैशाची चणचण भासायची. अशाच वेळेस, एक गृहस्थ त्यांना भेटले. एक लाख रुपये वर्गणी स्वरूपात देऊ केले. परंतु, एक अट घातली ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेला माझे नाव दे द्यायचे अर्थात ताडकन अण्णांनी हा प्रस्ताव उधळून लावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत संकल्पनेतून रयत शिक्षण संस्था निर्माण झालेली आहे, तिचे नाव अजरामर राहणार, असे छातीठोकपणे सांगितले. पैशापेक्षा तत्वाला आणि बहुजन हिताला प्राधान्य देणारे असे, आपल्यांना रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष ग्रामीण भागामध्ये पसरवल्या मागे अण्णांचा निखळ हेतू होता. त्यामुळे आज खूप शिक्षण संस्था असूनही रयत शिक्षण संस्था आपल्याला जवळची वाटते.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, शिक्षकाने मुलांना आपल्या मुलांना समान वागवावे, प्रशासनाने शिक्षक आणि विद्यार्थी यांचे हित पहावं, असा साधा-सोपा विचार घेऊन आपल्या वर्तनातून मानवतावाद सिद्ध करणाऱ्या अण्णांच्या विचारांचा कार्याचा कल्पकतेचा आदर्श सर्व शिक्षण क्षेत्राने घ्यावा. दर्या-खोर्यातून अनवाणी पायपीट करत शिक्षणाचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या , कर्मवीरांना नमन करण्याचा हा छोटासा प्रयत्न ....
शिक्षित करण्या समाजाला ढाल घेतली हिमतीची
अनंत काली चमकत राहील गाथा कर्मवीरांची
बहुजन हितासाठी लढली आपली माऊली
अण्णा सात्विक मूर्ती ,उभी वटवृक्षाखाली
उभी वटवृक्षाखाली
Kommentare