भ्रूण, नवजात बाळ, अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध इत्यादी अनेक टप्प्यांपैकी एका विशिष्ट संक्रमणाच्या कालावधीला किशोरवय म्हणतात. सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. या काळात मुलींमधे आणि मुलांमधे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक बदल होत असतात. या काळाच्या सुरुवातीस शरीरातील अंतःस्रावांमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे माणसाच्या लैंगिक विकासाला सुरुवात होते आणि त्याच बरोबर दुय्यम लैंगिक चिन्हेही दिसू लागतात. याच काळात मुले-मुली इतर वाईट मुला-मुलींच्या संगतीने व्यसनाधीन अथवा वाम मार्गाला सुद्धा लागू शकतात. कुटुंबाने आणि समाजाने या गोष्टी वेळीच ओळखल्या तर त्या टाळल्या जाऊ शकतात.
किशोरवय किंवा किशोरावस्था म्हणजे मोठे होणे किंवा मोठे होण्याचा काळ. किशोरवय हा अपरिपक्व मुलगाच, कुमारांचे पूर्ण वाढ झालेल्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा कालखंड आहे. माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून अथवा त्याही आधी गर्भधारणेपासून सुरू असले, तरी त्यांच्या व त्यातील लैंगिक विकासाच्या टप्प्याला 'पौगंडावस्था..' म्हणतात.
संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेपासून सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामध्ये माणसाच्या शारीरिक, लैंगिक, मानसिक व सामाजिक वाढ आणि विकासाचा समावेश होतो. या प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होत असल्याने व कमी-अधिक काळापर्यंत सुरू राहात असल्याने किशोरावस्थेची निश्चित व्याख्या करणे व कालमर्यादा ठरवणे अवघड आहे. त्यातही मुलींत हा कालावधी मुलांपेक्षा आधी सुरू होतो व आधी संपतो. मुलींत १० ते १६ व मुलांत १२ ते १८ वर्षे इतका असतो. मुलांची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परीस्थिती, पोषण, भोवतालचे वातावरण इत्यादींवर तो अवलंबून असतो. दारिद्र्य व कुपोषणामुळे हा कालखंड उशीरा सुरू होतो. तो निरनिराळ्या ठिकाणच्या प्राकृतिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांप्रमाणेही बदलतो. या कालखंडाची सुरुवात आता पूर्वीपेक्षा लवकर होत असली तरी, शिक्षणाचा लांबलेला कालावधी व पालकांवर अवलंबून असण्याचा वाढलेल्या काळ यांचा विचार केल्यास संपूर्ण व स्वयंपूर्ण पुरुष/स्त्री बनायला आता खूपच जास्त वेळ लागतो.
किशोर अवस्थेतील या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बदलाच्या, विकासाच्या काळात मुले-मुली आत्मकेंद्रीत, लाजाळू, एकलकोंडी बनतात. शरीरातील अंतर्स्त्रावी ग्रंथींमध्ये बदल होऊन शरीराचा आकार बदलू लागतो. उंची वाढते, जननेंद्रियांची वाढ होते. आहारामध्ये सुद्धा वाढ होत असते. कुटुंबातील सदस्यांनी मुलांच्या या किशोरवयीन अवस्थेतील काळात जेवण, खाणे यावर लक्ष व व्यायाम करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मुलांना सकस आहार देण्याबरोबरच खुल्या मैदानावर व्यायामासाठी आग्रह धरण्याची गरज आहे. त्यांचे मित्र-मित्र कोण आहेत याची वरचेवर चौकशी करण्याची आवश्यकता आहे. घरच्या घरी सुद्धा मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाची ओळख करून देण्याची आवश्यकता या काळात असते.
शारीरिक विकासाबरोबरच मन, भावना, प्रेम, बुद्धी, हुशारी, परस्पर विश्वास यांचाही विकास मुला-मुलींमध्ये या काळात होत असतो. विविध कलागुणांची आवड, ओळख, जिज्ञासा, चिकित्सा त्यांच्या मनामध्ये या काळात उत्पन्न होत असते. त्याचबरोबर भविष्यातील स्पर्धेच्या युगातील होऊ घातलेल्या त्यांच्या पुढील आयुष्यातील वाटा, आव्हाने आणि स्पर्धा यांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये चिंता आणि आकर्षण असते. सामाजिक संस्थांनी, शाळांनी व महाविद्यालयांनी किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा लैंगिक शिक्षणाची, त्यांच्या पुढील भविष्यातील, शैक्षणिक, व्यावसायिक व त्यांच्या आवडीच्या वाटांची ओळख त्यांना व्याख्याने, दृकश्राव्य माध्यम व इतर माध्यमांद्वारे करून देण्याची गरज आहे. किशोरवयीन मुला-मुलींना या काळात योग्य सुरक्षित वातावरण, आर्थिक पाठबळ, वेळ आणि पाठीवर शाबासकीचा, प्रेमाचा, विश्वासाचा हात समाजाने आणि कुटुंबाने देणे खूप गरजेचे आहे. जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी योग्य वयात योग्य शिक्षण देऊन, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यामधूनच या किशोरवयीन मुलांचे आयुष्य चांगले घडेल; आणि त्यातूनच उद्याचे सुजान, सुसंस्कृत, ध्येयवादी आणि सुदृढ नागरिक तयार होतील. 'देशाचे भविष्यही सुरक्षित राहील याच मुलांच्या हाती.'
डॉ. प्रविण शांताराम डुंबरे,
ओतूर (पुणे )
Comments