चपळता म्हणजे शरीराच्या संवेदनात्मक कार्यांच्या सहकार्याने शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. चेंडू पकडताना बॉल, हात आणि डोळ्यांचा समन्वय असल्याशिवाय क्रिकेटच्या खेळाला काहीही महत्त्व येत नाही. चपळता ही शरीराची स्थिती त्वरीत बदलण्याची क्षमता आहे आणि समतोल, समन्वय, वेग, प्रतिक्षेप, सामर्थ्य आणि सहनशक्ती यांचा वापर करून वेगळ्या हालचाली कौशल्यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. आक्रमणाच्या खेळांमध्ये कौशल्य महत्त्वाचे आहे. खेळाच्या मैदानावर, चपळतेला दिशा किंवा गती बदलण्यापूर्वी, प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींद्वारे सादर केलेल्या उत्तेजनावर प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. चपळता म्हणजेच कुशलता. कोणत्याही प्रसंगी योग्य आणि चटकन निर्णय घेणं. यासाठी ताकद व लवचिकता या दोघांची सांगड घालणे महत्त्वाची ठरते आणि त्याचबरोबर गरज असते मानसिक शांती आणि चातुर्याची.
घरामध्ये आपण वीज वापरतो त्या चपळ आणि खूप वेग असणाऱ्या विजेला 'चपला..' असेही नाव आहे. ती चपळ असते म्हणून चपला. आपण बटन दाबल्यावर क्षणार्धात एखादा बल्ब किंवा एखादी वस्तू जलद गतीने चालू होते. पाऊस पडण्यापूर्वी अथवा पडताना अवकाशात ढगांवर ढग आढळल्यामुळे खुप मोठी वीज तयार होते. ही वीज प्रचंड मोठा आवाज करते ज्याला आपण सर्वजण घाबरत असतो. घरातील वीज अथवा आकाशातून पडणारी वीज दोन्हीही त्यांच्यामध्ये असणाऱ्या शक्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात मानवी व प्राणी जीवनाला हानी पोहोचवत असतात.
गोगलगाय, कासव, अजगर, म्हैस, रेडा, हत्ती हे प्राणी संथ चालतात. तर हरीण, कुत्रा, कांगारू, बैल, घोडा, वाघ, सिंह हे प्राणी चपळ असतात. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या चित्त्याला जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी असे म्हटले जाते. चित्ता ३ सेकंदात ताशी९५ किमीपेक्षा जास्त वेगाने धावू शकतो. मांजरकुळातला हा प्राणी सर्वात चपळ म्हणून ओळखला जातो. काही परिस्थितीत ताशी १२० किमी या वेगाने देखील हा धावू शकतो. चित्त्याची शरीराची रचना, त्याचे लांब पाय यामुळे त्याच्या तावडीतून शिकार करताना भक्षक सहसा सुटत नाही. चपळ असणारा मनुष्य अथवा प्राणी हा पातळ शरीराचा चंचल आणि कार्यक्षम असतो, तर चपळ नसणारे प्राणी मात्र जाडपनाकडे झुकतात. प्रत्येक प्राणीमात्राला निसर्गाने गरजेनुसार शरीर संपदा दिली असली तरी मुंगी सातत्यपूर्ण कामामुळे तिच्या आकारापेक्षा मोठा असलेला साखरेचा दाणा अथवा एखादी वस्तू वाहून नेताना दिसते. धिप्पाड शरीर यष्टीचा हत्ती ताकतीच्या जोरावर मोठमोठाली झाडे बोला हलवताना दिसतो. तर घोडा हा प्राणी चपळ आणि शक्तीवानही मानला जातो. चपळ असणाऱ्या ससा आणि कासवाच्या गोष्टीतील कासव हे हळूहळू जरी चालत असले तरी आयुष्याच्या शर्यतीत, वयोमानात मात्र सर्वात जास्त म्हणजे दीडशे वर्षापर्यंत टिकते.
प्रत्येक मनुष्य प्राण्याला व पशु पक्षांना या जगाच्या पाठीवर जगत असताना खाण्यासाठी अन्न लागते. हे अन्न त्याला इतक्या सहजासहजी मिळत नाही. हे मिळवण्यामध्ये स्पर्धा असते. जर चपळता दाखवली नाही, पळाले नाही तर स्पर्धेच्या या युगात उपाशी राहू नये म्हणून त्यांना जलद गतीने हालचाल करावीच लागते. पशु पक्षांनी चपळता दाखवली नाही तर जास्त चपळ असणाऱ्या पशुपक्ष्यांचे ते भक्ष बनतात. मनुष्यास मात्र या पृथ्वीवर जगण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. काम आणि कष्ट करून हा पैसा त्याला मिळवावा लागतो. काम कष्ट न करता तो जर आळशी राहिला तर त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते अथवा शेवटचे म्हणजे भिक्षा मागावी लागते. बालपणी बालके चपळ आणि चंचल असतात. हीच मोठी झाल्यावर चपळ, चंचलते बरोबर ताकदवानही होतात. ज्येष्ठतेनुसार वृद्धापकाळी ही चपळता हळूहळू कमी कमी होत जाते, आणि शेवटी शरीरातील चैतन्यरूपी आत्मा क्षीण होऊन शरीराला सोडून जातो. प्रत्येक वयोमानामध्ये व स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा प्रत्येक मनुष्यामध्ये चपळता कमी अधिक प्रमाणात दिसून येते. काही लोक मंदबुद्धी आणि हालचालीचे तर काही अति चपळ, चंचल असतात. या चपळतेच्या आणि बुद्धीच्या जोरावर मनुष्य इतर प्राणिमात्रांवर काबू ठेवून एकमेकांमध्ये सुद्धा प्रतिस्पर्ध्याच्या रूपाने प्रगती करताना दिसून येत आहे.
व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. जर देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी, स्वस्थ, सुदृढ आणि कुटुंबस्वास्थ जर जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, मायेचे, निगर्वी व मंगलमय असेल, तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक स्थितीदेखील सुधारू शकेल. 'येरेहरी दे खटल्यावरी..' असे कधीही होणार नाही चपळता आपल्याला कधी ना कधी दाखवावीच लागेल. आणि हीच चपळता प्रत्येकाने वेळेत दाखवली तर चांगले शिक्षण, चांगली नोकरी, चांगले कुटुंब चांगला समाज आणि चांगला देश यांच्यात नक्कीच रूपांतरित होईल. धरतीलाही सुजलाम सुफलाम बनवण्याची ताकद या चपळतेत आहे.
पण, आपली आजची पिढी पाश्चात्त्य अनुकरणापायी आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्याचबरोबर जगण्याची स्पर्धा, कामाच्या ताणामुळे अथवा संगतीमुळे व्यसनाकडेदेखील वळत आहेत. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न मानवनिर्मित आहेत, जे आज आपल्यालाच सोडवावे लागतील अन्यथा आपल्या सर्वांच्याच आरोग्यावर याचे दुष्परिणाम दिसतील. व्यायाम हे एक असे सुव्यसन आहे ज्यामुळे आपण वाईट मार्गी देखील कधीच जात नाही. आरोग्याच्या दृष्टीने आज आपल्याला मॉल्सऐवजी बागांची जास्त गरज आहे. प्रदूषणापेक्षा स्वच्छ हवेची गरज आहे, औषधांपेक्षा व्यायामाची गरज आहे. नुसत्या आयुष्यापेक्षा सुंदर जीवनाची गरज आहे. म्हणूनच गोष्टीतला ससा कितीही उड्या मारत असला, तरी तो व्यायाम न करता त्याच्या आरोग्याला केवळ थकवा देत होता. त्यापेक्षा कासवासारखी निश्चयी प्रवृत्ती, एकाग्रता आणि कामाचा ध्यास जर आपण जोपासला, तर आपणदेखील चपळ राहून निश्चित त्यासारखे शंभर वर्षे सुखी आणि निरोगी जगू.
डॉ. प्रविण डुंबरे,
ओतूर (पुणे)
९७६६५५०६४३
コメント