top of page
Writer's pictureMs. Harshadaa Potadar

II तमसो मा ज्योतिर्गमय II

मुळातच माणूस हा समाजप्रिय आणि उत्सवप्रिय प्राणी आहे. आणि खरं तर सामाजिक एकात्मतेची भावना सदृढ करण्याची खरी किमया हे सण - उत्सव करत असतात. त्याचबरोबर, अमूल्य असे ज्ञान देत, समृद्धतेकडे जाण्याचा मार्गही सुचवत असतात.


फक्त , आपण थोडे सजग असायला हवे.


नाही का?


दिवाळी म्हणजे तर सणांचा राजा . पाच दिवस चालणाऱ्या या दीपोत्सवातील प्रत्येक दिवस हा उत्साहाने भरलेले आणि रोषणाईने भारलेला असतो.


दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दीपोत्सव म्हणजेच दिवाळी.


दिवा म्हणजे दीप हे अग्नीचे रूप. दीपज्योत ही ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतीक आहे. पंचमहाभुतांमध्ये अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व आहे . मानवी उत्क्रांतीचा आलेखच मुळी अग्नीच्या शोधापासून सुरु होतो.


दिवा म्हणजे प्रकाश दाखवणारं साधन. आतमध्ये असलेली तेलवात योग्य पद्धतीनं प्रज्वलित केली की दिवा 'लागतो' नि शांत, मंद, आवश्यक तेवढं दाखवणारा प्रकाश देतो.


ॐ असतो मा सद्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय

मृत्योर्मा अमृतं गमय

ॐ शांति: शांति: शांति: ||


आम्हाला असत्याकडून सत्याकडं न्या, अंधाराकडून प्रकाशाकडे न्या, मृत्यूकडून अमरत्वाकडं न्या.... शांती, शांती, शांती.


'असतो मा सद्गमय'. असत्याकडून, खोट्याकडून, मिथ्यत्वाकडून सत्यत्वाकडं, खर्याकडं जाण्याचा विचार.

व्यवहारात अगदी सामान्य पातळीवर जरी विचार केला तरी सामाजिक नीतीमध्ये खोटे बोलू नये खरे बोलावे हा एक संदेश सगळेच जण दुसर्याला देतात. स्वतः थोडीफार अम्मलबजावणी देखील करतात. अशा प्रकारे एक चांगला संदेश ‘असतो मा...’ मधून आपल्याला मिळतो.


सत किंवा सत्य म्हणजे जे त्रिकालाबाधित असतं ते 'सत्य'. भूतकाळात होतं, आज आहे नि भविष्यात सुद्धा असणार आहे नि सगळीकडे तितकंच, तेवढंच असणार आहे, त्याला सत म्हणावं असं उपनिषद आपल्याला सांगतं.


'तमसो मा ज्योतिर्गमय' नि हे आपल्याला दीपावलीशी साधर्म्य दाखवतंय. तमस म्हणजे अंधार. ज्योतिचाच अर्थ प्रकाश नि त्यामुळं सहज सोपा अर्थ होतो तो म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडं जाण्याचा विचार व्हावा. अंधार, काळोख म्हणजे जणू अज्ञान, भीती, धास्तीचा विचार तर प्रकाश म्हणजे ज्ञान, शक्ती, ऊर्जा, निर्भयता.


एकदा हे वास्तव पटलं की मृत्यू आला तर मी जाणार की माझं काही जाणार आहे ह्याबाबतची खात्री नक्की होते नि स्वत:च्या अ-मृतत्वाची जाणीव आपल्याला होते. अर्थात हे निव्वळ शब्दांनी नव्हे तर विचारांनी, त्यांच्या निदिध्यासानंच शक्य होतं. 'मृत्योर्मा अमृतं गमय' हे चरण म्हणजे जणू वरच्या दोन्ही चरणांचा परिणाम आहे.


एकदा वास्तवाची ओळख पटली की हव्यास थांबतो. कारण अनाकलनीय संग्रह, स्पर्धा, भीती, द्वेष, मत्सर सगळं सगळं थांबतं नि आत्यंतिक शांततेचा अनुभव 'आतमध्ये' येतो. 'शांति: शांति: शांति:' म्हणण्यामागची भावना हीच असते.


ह्या दीपावलीच्या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांना सत्यत्वाचा, ज्ञानाचा, अमृतत्वाचा अनुभव घेता येवो , हीच प्रार्थना.




ll शुभ दीपावली ll





Comments


bottom of page