H2O हे रासायनिक सूत्र असलेले पाणी हे, हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणू असा संयोग आहे. पाणी गंधहीन, चवहीन आणि रंगहीन सुद्धा आहे. कोणत्याही पदार्थांचे मिश्रण करण्यासाठी पाण्याचाच उपयोग केला जातो. आणि आपण बालपणापासून तेच या लोकप्रिय गीता द्वारे नेहमी ऐकत आलेलो आहोत.
'पानी रे पानी तेरा रंग कैसा,'
'जिसमें मिलाए उस जैसा'...'
'हे शोर..'१९७२ सालच्या या चित्रपटामधील, अभिनेते मनोज कुमार व जया यांच्यावर चित्रित झालेले आणि लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेले हे गाणे पूर्वीच्या काळी खूपच गाजले होते.
पृथ्वीवर ७० टक्के पाणी आहे. त्यामधील फक्त ३ टक्के इतकेच पाणी पिण्यायोग्य व शेतीच्या कामास येते. उर्वरित पाणी हे समुद्राचे खारे पाणी आहे. ज्याचा वापर शेतीसाठी किंवा पिण्यासाठी होत नाही. काही देशांमध्ये या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग उद्योगधंदे, शेती व पिण्यासाठीही केला जातो. भारत देशाचा विचार केला तर भारताला, अरबी समुद्र व काही प्रमाणात बंगालच्या उपसागरात उन्हाळ्यातील सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन ढगांची निर्मिती होते. व हे ढग नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे समुद्रा वरून जमिनीकडे वाहत येऊन त्यांना थंड हवा लागली की, टप.. टप.. बरसतात आणि आपणास पावसाचे पाणी मिळते. भौगोलिक परिस्थितीमुळे एकसारखा पाऊस न पडता काही ठिकाणी अती पाऊस, तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशी अवस्था असते.
कोकण किनारपट्टीवर पावसाचे हे प्रमाण सर्वात जास्त असते, तर राजस्थान सारख्या भागात कमी पाऊस पडून रखरखीत वाळवंट तयार झाले आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण, घाटमाथा व मावळ भागामध्ये जास्त पाऊस पडतो. तर पूर्वेकडील भागात कमी प्रमाणात पाऊस पडत जातो. ज्या भागात जास्त पाऊस त्या भागात बागायती पिके घेतली जातात तर कायमच दुष्काळी परिस्थिती असलेल्या ठिकाणी जिरायती व ते सुद्धा वर्षातून एकदाच पीक घेतले जाते.
माणसाच्या शरीरात सुद्धा पाण्याचं प्रमाण ७० टक्के इतके आहे. सर्वच प्राणी मात्रांना दररोज आणि सतत पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. पूर्वकाळापासून मनुष्य वस्ती पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी, नदीच्या काठाकाठाने वसत असलेली आपणास दिसते. पिण्यासाठी, उद्योगधंद्यासाठी व शेतीसाठी माणसांना पाणी हवे असते. त्यासाठी मनुष्याने नद्यांवर मोठ मोठी धरणे बांधली आहेत. पावसाचे वेगवेगळ्या ठिकाणचे कमी जास्त प्रमाण पाहता असे म्हटले जाते की...'आता यापुढे गावागावांमध्ये, देशादेशांमध्ये भांडणे आणि युद्धे होतील ती पाण्यासाठी होतील.'
दररोजच्या वापरला पाण्याचे खूप महत्त्व आहे. वापरासाठी पाणी नसेल तर लगेचच पदार्थांमध्ये अस्वच्छता होऊन दुर्गंधी पसरली जाते. आणि आपोआप हात अथवा रुमाल नकाकडे जातो. आपल्याकडे पाहुणा आल्यावर सर्वप्रथम स्वागतच पाणी देऊन होते. पाणी विचारले अथवा दिले जाते. इतके पाण्याचे महत्त्व आहे. शरीराला पाणी हवे असेल तर घशाला कोरड पडते, तहान लागते. पाण्याअभावी चक्कर, बेशुद्धावस्था अथवा मृत्यूही ओढवू शकतो. आणि काही वेळेला पाणी पिवूनही तहान-भूक भागवली जाते.
शुष्क झालेल्या धरतीला भिजवण्याचे काम ढगांच्या रूपाने पाऊस पावसाळ्यात, तर कधी कधी अचानकपणे करत असतो. दोन तीन वेळा पडलेल्या पावसाने धरतीचे रूप संपूर्ण बदलून सुजलाम सुफलाम होऊन जाते. धरती हिरव्या रंगाच्या शालूने नटून बसली आहे असे आपणास वाटते. झाडे, वेली, पाने, फुले आणि फळांनी बहरलेली असतात. पाने, फुले आणि फळे हवेच्या झोताबरोबर अथवा झुळके बरोबर आनंदाने डोलू लागतात. फुले माणसाला सुगंध देतात तर फळे प्राणी मात्रांना त्यांची भूक भागवण्यासाठी कामाला येतात. शेतकरी पावसावर आणि त्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच शेती उत्पादने तयार करत असतो. भरघोस पीक उत्पादने घेवून तो सर्व जगाचा पोशिंदा होतो. म्हणून पाऊस पडल्यावर शेतकरी आणि अबाल वृद्ध सुद्धा आनंदित होतात. पशु-पक्षी देखील आनंदाने नाचू-बागडू लागतात. कोकीळ गावू लागते, तर मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. 'नाच रे मोरा.. आंब्याच्या वनात. नाच रे, मोरा नाच.' असे म्हणत मुले सुद्धा वेगवेगळे खेळ खेळतात.
पाऊस आणि पाणी कोणाला आवडत नाही? पाण्यात आणि धबधब्याखाली तर भिजायला सर्वच लहान थोरांना आवडते. ढगांपासून पाणी जमिनीला मिळते आणि ते नद्यांद्वारे समुद्राला जाऊन मिळते. समुद्राच्या पाण्याची उष्णतेने वाफ होऊन पुन्हा ढगांद्वारे आपणास पाणी मिळते असे चक्र सतत चालू असते. परंतु जगाचे वाढते तापमान आणि 'एल निनोचा' परिणाम यामुळे ऋतुचक्र बदलले आहे. बिघडलेल्या चक्रांपैकी आणखी एक म्हणजे जंगल. गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडणे एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत. जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा अवकाळी, अवेळी, ढगफुटी, गारपीट, महापूर, महाप्रलय इत्यादी प्रकारचा तर कधी कधी वेळेवर पडेनासा झाला आहे.
ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगर-माथेही उजाड होत आहेत. अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते अन्न आणि पाण्यासाठी मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या व जनावरे लहान मुले व मोठ्या माणसांवर सुद्धा झेप घेतल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.
दिवसेंदिवस होणार्या जंगल तोडीमुळे मातीची धूप, वृक्षांची कमतरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. गतवर्षी केदारनाथला आलेला पूर हा जंगलतोडीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे बाष्पिभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ह्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत. आणि त्यात विहिरींचे तळ आटत असून बोअरवेल्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणी खोल खोलवर जात असून ४०० ते ५०० फुटांवर बोअरवेलची खोली जात आहे आणि पाणी जर लागले नाही तर एक एक माणूस आठ दहा ते पंधरा ही बोरवेल्स घेऊ लागला आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरशः चाळण होत आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये होणारी पाण्याची नासधूस नक्कीच थांबवायला हवी आहे. पाण्याच्या एकेक थेंबापासून जलाशय आणि समुद्र सुद्धा बनतो तेव्हा पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब वाचवला पाहिजे.
विहिरी आणि बोरवेल यांचे पाण्याची योग्य नियोजन करून पुनर्भरण केले पाहिजे म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल.
झाडे लावा, झाडे जगवा..!
वृक्षसंपदा आता वाढवा..!!
धरणी मातेला पाचूच्या..!
दागिन्यांनी आता मढवा...!!
असे केल्याने धरती सुंदर हिरवीगार होईल, आणि तुमचा आमचा जीवश्च कंठश्च प्राण असलेल्या पावसाचे प्रमाण नक्कीच वाढेल.
डॉ. प्रविण शांताराम डुंबरे,
ओतूर (पुणे)
९७६६५५०६४३
पाणी ही जीवन है. अतिशय सुंदर लेख. मानवी जीवनातील पाण्याचे महत्व समजून देणार लेख....