बौद्धिक संपदा अधिकार नकारात्मक बाजू:
बौद्धिक संपदा अधिकार जसे आवश्यक आहेत त्याचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. बौद्धिक संपदा अधिकार हे एक प्रकारचे नकारात्मक अधिक आहेत, ज्याद्वारे इतर व्यक्तींना त्या वस्तूंची निर्मिती किंवा त्यासंबंधीत अधिकारापासून दूर ठेवले जाते.यामुळे बऱ्याचदा मक्तेदारी, एकाधिकार (मोनोपॉली) निर्माण होते त्यामुळे ती वस्तू ती व्यक्ती किंवा कंपनी ज्या किमतीत विकेल त्या किमतीत खरेदी करावी लागते.परिणामी ग्राहकांना सेवेसाठी अधिक मूल्य द्यावे लागते.
बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांचे हेतू
* बौद्धिक संपदा निर्मात्यांच्या निर्मितीवरील नैतिक आणि आर्थिक हक्कांना कायदेशीर अभिव्यक्ती प्रदान करणे.
* या बौद्धिक संपदा उपलब्ध होण्याबाबत इतरांचा अधिकार निश्चित करणे.
* शासनाचे काळजीपूर्वक प्रयत्न म्हणून बौद्धिक संपदांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे. त्यांचा वापर, प्रसार आणि योग्य व्यापार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करणे.
या हेतूं मागची कारणमीमांसा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. बौद्धिक संपदा या फारच कमी वेळेत मूर्त / ठोस स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांवरील अधिकार प्रस्थापित करणे व त्यांचे संरक्षण करणे ही बाब क्लिष्ट होऊन बसते. उदाहरणार्थ गाडी, इमारत वा दागिन्यांचा मालक त्यांच्या अवतीभवती सुरक्षेची ठोस व्यवस्था करू शकतो जेणेकरून त्यांचा अनधिकृत वापर, हरण किंवा नुकसान होणार नाही. मात्र बौद्धिक संपदेच्या बाबत ही शक्यता नसते. एकदा एका व्यक्तीस निर्मात्याने आपली निर्मिती सोपवली तर त्याने त्याची नक्कल केली, पुनर्वापर केला तर त्यावर निर्मात्याचे नियंत्रण राहीलच असे नाही. त्याऐवजी बौद्धिक संपदेच्या मालकाने तिच्या वापराचे नियंत्रित हक्क आर्थिक मोबदला घेऊन एखाद्या व्यक्तीला दिले तर त्याचा दोघांनाही फायदा होईल आणि त्यातून समाजासही त्या नवनिर्मितीचा फायदा होईल. हा विचार बौद्धिक संपदा कायद्यांमधील तरतुदींमागे आहे.
Comments