वाळवंटातून अथवा अति उष्णतेच्या प्रदेशातून जास्त ऊन असलेल्या वेळी जाताना माणसाला किंवा पशुंना एखादे तळे, पाणी असल्याचे भास होतात, भ्रम होतात. परंतु आशेने त्याच्याजवळ गेल्यानंतर मात्र भ्रमनिरास होतो आणि आपण जी गोष्ट पाहिली होती, त्या ठिकाणी ती अस्तित्वातच नाही, असे दिसते. मृगाला अति तहान लागल्यावर दूरवर पाणी आहे असे भासते, पण पळत जाऊन पाहिल्यावर त्या ठिकाणी पाणी दिसत नाही, भ्रमनिरास होतो. त्याला मृगजळ म्हटले जाते.
थंड हवेची घनता जास्त असते, ती हवा खाली जमिनीलगत असते. उष्ण हवेची घनता कमी असते. उष्ण हवेचा पट्टा हा या थंड हवेच्या पट्ट्याच्या वर असतो. सूर्याकडून येणाऱ्या प्रकाश किरणांनी दोन वेगवेगळ्या घनतेमधून प्रवेश केल्यानंतर त्यांचे वक्रीभवन होते आणि हे किरण परिवर्तित होऊन वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसाच्या डोळ्यापर्यंत पोहचतात व मृगजळ दिसते. उष्ण झालेली हवा वर वर जात असते, त्यामुळे ती त्या ठिकाणी फार काळ टिकत नाही, म्हणून मृगजळ सुद्धा आपणास थोड्यावेळा पुरतेच दिसते.
मानव हा समाजप्रिय व कुटुंबवत्सल प्राणी आहे. तो जन्माला आला की आई-वडिल, आजी-आजोबा, मामा-मामी, मावशी-काका भाऊ-बहीण, वहिनी इत्यादी नाती आपोआप तयार होतात. लहानचे मोठे होत होत खेळत, बागडत, शिकत, व्यवसाय, नोकरी करत करत त्याचे अथवा तिचे लग्नही होते. माणसाच्या लहानपणापासून मोठ्या होण्याच्या या जडणघडणीमध्ये मित्र, नातेवाईक व समाजाचीही खूप मोठी साथ व आधारही असतो. माणूस यापैकी एखाद्यावर विश्वास ठेवून मोठा होतो. वेळप्रसंगी एकमेकांना शिक्षणात, व्यवसायात मदत करतो. आपण दुसऱ्या बरोबर जसे वागतो किंवा आपण त्याला जशी मदत करतो तशी अपेक्षा तो इतरांकडून करत असतो. मनात एखाद्या व्यक्तीबद्दल असलेल्या नात्याबद्दल तो आडाखे बांधून बसलेला असतो.
लहानचं मोठं केल्यावर, शिक्षण दिल्यावर नोकरीला लावल्यावर, लग्न केल्यावर व जीवनात स्थिरस्थावर करून दिल्यानंतर आई-वडिलांना मुलांविषयी अपेक्षा असते. त्यांना वाटतं आपली मुले आपल्याशी चांगली वागतील आणि वाईट वागणारच नाहीत. सासु-सुनांमध्ये, ननंद-भावजयांमध्ये, भावा-भावांमध्ये, भावा-बहिणींमध्ये आणि मित्रा-मित्रांमध्ये सुद्धा नातं खूप चांगलं राहील... समोरचा माणूस चांगला वागेल... असेच मनामध्ये गृहीत धरलेले असते. परंतु, पुढील माणूस हा कधीकधी आतल्या गाठीचा, चालाख, धूर्त, स्वतःच्या पायाजवळ पाहणारा, कपटीही असू शकतो. त्याने मनात बांधलेल्या या आडाख्यांचा काही दिवसांनी त्याला भ्रम दिसू लागतो. आणि मृगजळासारखं जे मनात वाटत होतं तसे न भासता, खरे आहे ते रूप त्याला त्या नात्यांमध्ये स्पष्ट दिसते. मग तो म्हणतो.. 'माझा भ्रमनिरास झाला आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता... तुझ्यावरचा विश्वास आता उडाला आहे.'
मानसिक आरोग्यामध्ये एखाद्या व्यक्तीने ठराविक गोष्टींवर वरचेवर जास्त विचार केला तर... मनामध्ये भ्रम, संभ्रम निर्माण होतात. मग या अति विचाराने मेंदू थकतो, मेंदूमध्ये केमिकल लोचा होतो. माणूस एकाकी राहू लागतो. भ्रमिष्टा सारखा सुद्धा वागू लागतो.
हे सर्व टाळायचे असेल तर माणसाने आत बाहेर एकसारखे वागावे. कपट करू नये. ओठात एक पोटात एक असे वागू नये. एकमेकांचा तिरस्कार करू नये, नात्यांमध्ये आदरभाव बाळगावा. 'पुढच्याला आपण जर सन्मान दिला तर तोही आपल्याला सन्मानच देईल.' तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा वृद्धपणी सांभाळ करा त्यांच्यावर प्रेम करा म्हणजेच तुमची पुढील पिढी तुम्हालाही प्रेम, मान-सन्मान देईल आणि तुमचाही सांभाळ करेल. वस्तुस्थिती जशी आहे तशी दिसेल... कुणालाही मृगजळ दिसणार नाही आणि सर्व जग सुखी होईल. रखरखीत वाळवंटात पाण्याच्या स्त्रोतामुळे ओॲसिस; म्हणजे मरुद्यान किंवा मरूबन निर्माण होते. त्याप्रमाणे नात्यांच्या माया, ममता व प्रेमाच्या ओलाव्यामुळे जीवनात सुखाची हिरवळ व सुखाचा स्वर्ग निर्माण होईल.
बालपणी अंघोळी वरून आलेल्या साने गुरुजींच्या पायाला माती लागू नये म्हणून, साने गुरुजींच्या ओल्या पायाखाली स्वतःचा पदर अंथरणारी साने गुरुजींची आई... साने गुरुजींच्या लिखाणातून अजरामर झाली. आणि त्या प्रेमळ आईच्या संस्कारांनी वाढलेल्या साने गुरुजींनी जगाला प्रेमाचा संदेश दिला...
'खरा तो एकची धर्म...
जगाला प्रेम अर्पावे...'
©️®️
डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर
शिवजन्मभूमी (पुणे)
९७६६५५०६४३
Comments