top of page
Writer's pictureDr. Prain Dumbre

विश्वास

विश्वास म्हणजे श्रद्धा किंवा खात्री. दैनंदिन जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून आपण एकमेकांवर विश्वास ठेवत असतो. कोणत्याही वस्तूवर, प्राण्यावर किंवा माणसा - माणसामध्ये आपले भावनिक नाते तयार होत असते. नवीन नवीन गोष्टीवर एवढ्या सहजासहजी कुणाचाही विश्वास बसत नाही. परंतु, कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी काही कालावधी मात्र जरूर जाऊ द्यावा लागतो.


मूल लहान असते तेव्हा आई-वडिलांचा हात धरून चालत असते. एवढ्या बाल वयातही उडी मारताना आई-वडिलांवर सर्व अंग झोकून देते. त्याला माहीत असते, विश्वास असतो. आपले आई वडील आपल्याला खाली पडू देणार नाहीत. मुलांच्या आयुष्यातील कपडे, वह्या, पुस्तके, जेवण खाणे, औषधे, शिक्षण, करियर या सर्व बाबींमध्ये मुले आई-वडिलांवर जबाबदारी सोपवून देतात. त्यांना संपूर्ण खात्री असते की आई वडील आपले चांगलेच करतील. आपले भविष्य उज्वल होण्यासाठी आई-वडिलांची खूप मोठी मदत होणार आहे. स्वत:च्या आई-वडिलांवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवा. जगातील कोणतेही आई-वडील मुलांचे खूप चांगले मित्र, हितचिंतक असतात. बाहेरच्यांवर मात्र डोळे उघडे ठेवून, अनुभवातून विश्वास ठेवला पाहिजे.


शिक्षणासाठी घरापासून आणि आई-वडिलांपासून जेव्हा मुले दुसऱ्या गावी किंवा परदेशात जात असतात, तेव्हा आई-वडिलांची आठवण आल्यावर पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र किंवा पाकिटा मधून आई-वडिलांना पुर्वी आपण ख्यालीखुशाली कळवत होतो. पत्राचा मायना संपत आल्यावर सर्वात शेवटी लिहिले जायचे.. 'आपला विश्वासू' किंवा 'आपला आज्ञाधारक.' आई-वडिलांचा आपल्यावर खूप विश्वास असायचा. आपली मुले शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेलेली आहेत आणि ती तिथे अभ्यासाकडे संपूर्ण लक्ष देऊन शिक्षणच घेतील. इतर वाईट प्रवृत्तीच्या मुलांच्या नादाने वाहवत जाणार नाहीत. यासाठी प्रत्येक वेळी त्यांना 'चांगला अभ्यास कर, चांगल्या मुलांची संगत ठेव, गुरुजनांचे ऐक,' असे एक ना अनेक चांगले विचार सतत सांगितले जायचे. आणि मग त्यांची आज्ञा पाळून पत्रात शेवटी त्यांना आपणही 'आपले विश्वासू' असे लिहिले जायचे.


आई-वडिलांनंतरचे शाळेतील आपले गुरु म्हणजे शिक्षक, हे आपल्याला संपूर्ण ज्ञान देत असतात. पूर्वीच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून ज्ञान घेण्याचे काम करत असे. त्यानंतरच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा नवीन नवीन खूप बदल होत आलेले आहेत. शिक्षणाच्या या वळणावर... शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच शिस्त, प्रेरणा, जिद्द, प्रामाणिकपणा आणि बाह्य ज्ञान यांची शिदोरी मिळत असते. जी विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडते. शिक्षकांनाही विद्यार्थ्यां बद्दल मग खात्री आणि विश्वास असतो की आपण घडवलेले हे विद्यार्थी पुढे नक्कीच खूप मार्क्स पाडून उत्तीर्ण होतील. नवनवीन क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करतील आणि जीवनामध्ये खूप यशस्वी होतील. शालेय जीवनातील, घरातील संस्कारांच्या शाळेतून तावून सुलाखून निघालेली ही मुले मग आपल्या गुरूंना पुढील जीवनात यशस्वी होण्याचा विश्वास आणि खात्री देतात.

'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा'

'आम्ही चालवू हा पुढे वारसा'


आपण जेव्हा बाजारात, दुकानात भाजीपाला अथवा एखादी वस्तू घ्यायला जात असतो. त्यावेळी आपण जो विक्रेता चांगली वस्तू ठेवतो किंवा पूर्वी नेलेल्या वस्तू चांगल्या निघालेल्या असतात, टिकतात, दर्जेदार असतात.. त्याच दुकानात पुन्हा जात असतो. वस्तूंची, विक्रेत्याची किंवा दुकानाची खात्री असेल तेथेच माल खरेदी करतो. ग्राहक दुकानदाराला विचारत असतो.. 'ही वस्तू चांगली निघेल का? टिकेल का? काही अडचण तर येणार नाही ना?' आणि दुकानदार त्या वस्तूं बद्दल खात्री देत असतो. 'माझ्या विश्वासावर तुम्ही ही वस्तू घेऊन जा. काही अडचण येणार नाही. खूप दिवस टिकेल.' आणि पुन्हा म्हणतो.. 'काही अडचण आली तर मी आहेच. बदलून देईल, गॅरंटी देतो, वॉरंटी देतो, इत्यादी.'


.... आणि लोक जेव्हा वस्तू घेऊन जातात, उधारी करतात, बाजार भाव कमी करतात. कमी पैसे देतात. आणि 'आम्ही काय पळून चाललो आहे का? आता आमच्यावर विश्वास नाही का?' असे म्हणतात. मग आपण नेहमी ऐकत असतो... इतिहासातील पानिपतच्या लढाईतील दाखला ग्राहकांना दिला जातो, की 'विश्वास केव्हाच पानिपतच्या लढाईत गेला.' 'आता आम्ही उधारी ठेवत नाही. आज रोख उद्या उधार.' 'आता आमचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही.'


दुकानदारांना, व्यावसायिकांना, घरातील काम करून घेणाऱ्या मालकांना नोकर किंवा कामवालीची गरज असते. मग तोंडी सांगितले जाते, किंवा जाहिरात दिली जाते. 'विश्वासू किंवा इमानदार माणूस, नोकर हवा आहे.' मालकांची मर्जी विश्वास संपादन करून, अनेक वर्ष कष्ट करून काही लोक पुढची पुढची पदे घेत जातात. कधी कधी बढती होऊन किंवा नोकर सुद्धा मालक होऊन जातो. विश्वास ठेवा.. आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं.


संसार हा विश्वासावर अवलंबून आहे. लग्न जमवताना मुलगा मुलगी पाहण्या साठी जाताना, विश्वासू मध्यस्थ असेल तर लवकर पुढाकार घेतला जातो. विश्वासू मुले मुली असतील तर लग्नही लवकर जमते. आणि विश्वासच जीवनातील पुढील संसार टिकवतो आणि शेवट करतो.


दररोज आपल्या कानांवर बऱ्याच गोष्टी येत असतात. त्यात काही चांगल्या, काही वाईट असतात. भांडण, खून, मारामाऱ्या, अपघात, लोकांचं वाईट वागणं, वाईट बोलणं. काही समाजकंटक सुद्धा धर्मा धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असतात. या सर्वच गोष्टी खऱ्या असतीलच असे नाही. त्या अफवेची योग्य त्यावेळी योग्य ती खात्री करून घेतली पाहिजे. 'अफवांवर विश्वास ठेवू नका...' असे वर्तमानपत्र, टीव्ही मध्ये नेहमी सांगितले जाते.


आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवू नका. एक टीव्ही चॅनेल नेहमी सांगत असतो 'उघडा डोळे बघा नीट'... मग आता निवडणुका निमित्त नवनवीन उमेदवार ही येतात जातात. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होतात. हे सर्व लोक आपल्याला 'आम्ही असे कामे करू, अशा अशा योजना राबवू' अशी आश्वासने देतात. काही मतदार सुद्धा मग पैसे, पार्ट्या आणि आश्वासने मिळाल्यावर डोळे झाकून त्यांना मतदान करतात. पुढील निवडणुकीपर्यंत मग त्यांच्या हातात काही राहत नाही. मंत्र्यांची शून्यातून पाच पाच वर्षात होणारी प्रगती.. बंगले, गाड्या, जमिनी आणि कारखाने पाहून त्यांचे डोळे दिपून जातात. आता.. कोणाचेच कोणाला सोईर सुतक राहिलेले नसते. आणि मग आमदार, खासदार यांची पळवा पळवी होते. कोण कुणाचा माणूस आहे, हेच समजेनासे होते. राजकारणाचा सगळा तमाशा होतो. मतदारांच्या विश्वासाला तडा जातो. सरकारच्या कामगिरी विरोधात विरोधकांकडून अविश्वास ठराव टाकला जातो. आणि अविश्वास ठराव हरला जातो किंवा चांगल्या सरकारच्या पाठीशी चांगले लोक राहून जिंकला जातो.


अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. काही लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जवळ येतात. जोपर्यंत आपला चांगला काळ आहे, तोपर्यंत गोड गोड बोलून स्वतःचा फायदा करून घेतात आणि मग फायदा संपल्यावर विश्वासघात करतात. कोणाचाही विश्वास संपादन करायला खूप दिवस लागतात. पण त्यांचं स्वार्थी वागणं जेव्हा आपल्या नजरेसमोर येतं तेव्हा क्षणार्धात आपला त्या व्यक्ती बद्दलचा विश्वासघात होतो...तो मनुष्य आपल्याला आपल्या डोळ्यांपुढे पुन्हा कधीही येऊ नये असे वाटते. 'लांडगा आला रे आला...' या उक्तीप्रमाणे त्यानंतर कितीही चांगले वागून काहीही उपयोग नसतो. मग माणूस म्हणतो, 'आता तर मला कुणावर विश्वास ठेवावा, अन् कुणावर नको असे झालं आहे.' 'आता माझा कोणावरही विश्वासच राहिला नाही.'


स्वतः चांगले वागा. चांगले गुण, संस्कार अंगीकार करा आणि मग स्वतःवर जरूर विश्वास ठेवा.

©️®️

🦚 डॉ. प्रविण डुंबरे 🦚

ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे

९७६६५५०६४३

1 comentario


फार सुंदर व अभ्यासपूर्ण लेख. अभिनंदन.

Me gusta
bottom of page