top of page

संघर्षाच्या पलीकडे .....

Writer: Ms. Harshadaa PotadarMs. Harshadaa Potadar

महिला उद्योजक, उद्योजिका हे शब्द आजही समाजाला नवीन असल्यासारखे वाटतात. शब्दकोशाचा मर्यादेत अडकलेले हे शब्द बोलीभाषेत कधी प्रचलित होणार ? कधी स्वीकारले जाणार ?


सामाजिक मानसिकता नक्कीच सुधारत आहे. आपण सगळे सध्या अशा एका रंजक वळणावर आहोत की यापुढे येणारे पुढील पाच वर्षे हे सर्व उद्योगासाठी - नवीन , जुन्या - क्रांतिकारी वर्ष ठरणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा सतत होणार अमर्यादित वापर, नानाविण वापरात येणाऱ्या अफलातून संकल्पना आणि ग्राहकांची बदलत जाणारी किंवा प्रगल्भ होत जाणारी आवड या सगळ्यामध्ये स्वतः:ला बसविण्याचा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागणार आहे.


भारतीय समाजात नव्याने ' उद्योजक ' म्हणून स्वतःला सिद्ध करणे, वाटते तेवढे सोपे नाही. आणि त्यातही तुम्ही स्वतः ला उद्योजिका म्हणून सिद्ध करू पाहत असाल तर एकाच वेळी , अनेक आघाड्यांवर, न घाबरता, न डगमगता , आणि कोणाच्याही पाठिंब्याशिवाय तुम्हाला उभे राहावे, लागणार आहे, याची तयारी असेल तरच पुढे जाऊया ...


परिस्थिती खूप काही शिकविते . परिस्थितीपुढे हात न पसरता , स्वतः: चा स्वाभिमान , कायम ठेवून, उद्योजिका म्हणून स्वतः: ला प्रस्थापित केलेल्या, अनेक मुली, कन्या, महिला आपल्या आजूबाजूला आहेत.

जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगात त्या कार्यरत आहेत ना :

तेवढेच वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न त्या रोज हाताळत असतात ;

प्रत्येकीच्या समस्या वेगळ्या असतील ;

त्या निरनिराळ्या शहरातील, गावातील असतील ; त्यांचा वयोगट वेगळा असेल ; त्या प्रत्येकीची कहाणी वेगळी असेल पण एक गोष्ट कायम आहे या सगळ्यांच्या बाबतीत ... आणि ती म्हणजे संघर्ष



हा संघर्ष देखील अनेक प्रकारचा आहे.. अनेक स्तरावर सतत करावा लागणार आहे. कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक आणि एकंदर प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या या संघर्षाचा सामना तिला एकटीलाच करायचा असतो.


" उद्योजिका " म्हणून समाजात वावरताना सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मानसिकता.


उद्योग ( किंवा नोकरी सुद्धा ) तुम्ही कोणत्याही कारणासाठी ( कुटुंबाला हातभार, स्वावलंबन, ध्येय पूर्तीसाठी , आर्थिक गरज म्हणून , इ.) करा ;' समाजाचा एक ठराविक साचेबंद दृष्टिकोन 2023 मध्येही टिकून आहे.


अशा वेळी भक्कम पाठिंबा हवा असतो तो म्हणजे कुटुंबाचा.. मुख्यत : जोडीदाराचा.


निरनिराळया ठिकाणी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष हे अजूनही हेच सांगत आहेत की , संसार सभाळून काय ते कर ( ? ) अशी मानसिकता ९० टक्के समाजाची अजूनही आहे आणि उरलेले ९ टक्के समाजात राहायला हवे ना, म्हणून गप्प आहेत.


बाकीच्या एक टक्का वर्गाला , मात्र मन: पूर्वक धन्यवाद.


तुम्ही येता का या एक टक्क्यामध्ये ?


हा एक अवघा टक्का म्हणजे तो सर्व समाज समाज , ते सर्व कुटुंबीय जे विरोध न करता पाठिंबा देतात... पाठिंबा म्हणजे आर्थिक मदत नव्हे ...


भारत देशाचे सर्वोच्च पद जसे राष्ट्रपती संरक्षणमंत्री अर्थमंत्री , भूषवीनाऱ्या महिला या देशातील आहेत , या मातीतील आहेत, तरीदेखील या भारत मातेच्या किती तरी मुलींना, कन्यांना , जगण्याचा , शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारला जातोय, यापेक्षा दुर्दैव कोणते ?


महिला उद्योजकांना अनेक प्रकारे उभे राहण्यासाठी देखील सर्वार्थाने मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि त्या सर्व महिलांनी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध देखील केली आहे.


संघर्षाच्या पलीकडे संघर्षाच्या पलीकडे जात, संघर्षावर जमेल तशी मात करता आली पाहिजे. अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची , सजगपणे , नैसर्गिक देणगी खर जन्मत: च यांच्याकडे असते. उद्योजिका म्हणून समोर येण्यासाठी फक्त मार्गदर्शकाची गरज असते आणि ती सुद्धा सुरुवातीच्या काही काळासाठी ....


आज उद्योजिका होण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी लागणारा आत्मविश्वास आणि धाडस मात्र आपल्याला दाखवायचे आहे.


महिला नेतृत्वाने खंबीर पणे सुरू केलेल्या गोष्टी आणि त्यामुळे समाजावर झालेले दूरगामी आणि सकारात्मक परिणाम , याची साक्ष देण्यासाठी , प्रगत मानव जातीचा इतिहास उभा आहे.


संघर्षाच्या पलीकडे जाण्यासाठी सज्ज आहेत ना ?


Comments


©2024 by AimSolute.

  • Facebook
  • LinkedIn
  • YouTube
bottom of page